Tuesday, February 6, 2024

अमर लता

काळ कुणाही साठी थांबत नाही! हेच खरं! मग कितीही मोठी असामी, असो.

देव भक्ती ,देशभक्ती कलेवरची निष्ठा , औदार्य उत्कटता ,विनय,स्वाभिमान,सर्वोत्तमाचा ध्यास ,सदैव शिकत राहण्याची अभ्यासू वृत्ती , तहानभूक विसरून गाणं ,अशी सर्व गुणसंपन्न लता ! आपल्या पिढीला असंच एक अद्भूत व्यक्तिमत्व अनुभवता आलं ;ते म्हणजे अमृतमय स्वरांची साम्राज्ञी ;लता मंगेशकर! 

आज लौकिक अर्थाने आपल्यात नाही ;दोन वर्षा खाली  माघी षष्ठी तिथीला (६फेब्रु.२२) तिने अलविदा केलं .ते पचवणं अवघडच !



एरवी ती अमृतवेल लता मनांत बहरलेलीच आहे .जराश्या आठवणीच्या हेलकाव्याने  गात डुलत राहते ! मग प्रसंग कुठलाही असो ! ती प्रत्येक भाव भावनेत स्वर रूपाने आहेच !फक्त माझ्याच नाही तर अगदी चराचराच्या!!

वृक्षवल्ली आम्हा ..मला पाखरांच्या कलरवांत ऐकू येतं .नागमोडी वळणा वळणाने जाताना, "दरीदरीतून मावळदेव" दिसतो. चांदण्या सांजेला ,"निळ्या आभाळी कातरवेळा" प्रतीत होते. लहरणा-या शेतात तिचा कोवळा,तजेलदार स्वर उमटतो, तर कधी जवानांच्या बंदूकीतील गोळ्यांप्रमाणे ,खटाखट सुटतो तो  गाण्याच्या आशया बरोबर आपल्या ही काळजाचा ही वेध घेतो.

भक्तीगीतातील समर्पण असं की की एखादा नास्तिकाला ही भक्तीगीत ऐकताना   कधी अश्रू ओघळले ?ते ही कळणार नाही. साक्षात देव च सन्मुख उभा करते आपल्या  स्वरांनी ,लता! "मोगरा फुलला "गाणं ऐकून खरोखरच मोगरा बहरून आल्यागत वाटतं!सुगंध जाणवतो! तो असतो  गंधवेड्या लताच्या  आत्म्याचा!

गाणं हा विषय जरी एकच असला तरी त्यातल्या भावभावनांचे अनेकानेक सुंदर पदर लताच्या स्वरात ठळक पणे दृगोचर होतात. कारण त्यातला अविर्भाव स्वरातून दाखवते लता. दीनानाथांचा अभिनयाचा गुण किती सहजपणे असतो लताच्या गाण्यात. बघा ना; ऐकताना सगळ्याची हीच मनःस्थिती होते .क्षणभर निस्तब्धच ! देशभक्ती गीतांनी  आबालवृध्दा सह  सगळ्यांनाच हेलावण्याचं सामर्थ्य आहे ;लताच्या स्वरात! 

परदेशातही आपल्या गाण्याची मोहोर उमटवणा-य लताने, "गाईन तर अल्बर्ट हॉल मध्येच! असं ठणकावून आपल्या भारत देशाला लंडन मध्ये  प्रतिष्ठा मिळवून दिली!

खट्याळ गाणी ही तितकीच मिश्कीलपणे गायलीत लताने! दिलमे बजी प्यारकी शहनाईयॉ....देखोजी बहार आयी ...पासून दिदी तेरा देवर दिवाना....पर्यंत  गाणं तसं सोप्पं नाहीच  काही! गाण्यात  ओघाने आलेले अपशब्द (रूढार्थी शिव्या )तिच्या आवाजात ओव्या होऊन जातात आठवा - बेरहम होते नही ऑसू... , वो s निर्दयी प्रीतम , बे दर्दी ,दगाबाज ,बेईमान... .......आणि कितीतरी ... आणि दुःख ? त्याचा ही एहसास लता च्या आर्त स्वरातून फार परिणामकारक रित्या होतो.(ख्वाब थे वो जिंदगीके दिन  जो ...मर गये हम ..)ऐकताना आपल्या ह्रदयात कालवा कालव होते.

आणि प्रेमगीतं !  त्याचे तर अनेकानेक पदर असे कांही दृगोचर केलेत की ज्याचे नांव ते!अगदी किशोरीच्या अल्लड पणापासून ते धीरगंभीर भावने पर्यंत चे रंगीबेरंगी पदर च! झूलेमे पवनके ...,तेरा तीर वो बेपीर...ए चॉद कल जो आना ,दिलका दिया जलाके गया...,छुपाकर मेरी ऑखोंको ... मिले तो फिर झुके....., कुछ दिलने कहॉ......, आजा रे मै तो कबसे खडी....., मेरे मनका बावरा पंछी ...तेरा खत लेके सनम ... घडी घडी मेरा दिल ...., तेरा मेरा प्यार अमर...मेरे मनके दिए...हे तर लताने मनाशी गूज च साधलंय अगणित च...!! आणि प्रेमाची युगलगीतं तर बहारीचीच!कांकणभर सरसच! स्वरांना हलकासा झोका देऊन त्या गीतावर स्वार होते .किंवा एखाद्या गोड तानेने आस लावते ! झाडून सगळ्या गायक गायिकांसह गायलेली युगुलगीतं ऐका , बरोबरीने रंगत आणतेच ;पण शेवटचा डॉट लताचा च! पंडीत भीमसेन जोशींसह गायलेलं ,"रामके गुणगान...हे प्रमाण आहे!विशेष म्हणजे त्या मातब्बर कलाकारांनी ही  हे मान्य केलंय. किती भाग्य !आणि हेच वैशिष्ठ्य  आहे लताचं!

रागदारीवर आधारीत लताची  सिनेमातील गाणी म्हणजे तर पर्वणीच कानसेनाची ! "सखी री सून मोरी ..." आशासह गायलेली जुगलबंदी च! मीनाकुमारीने ही छान वठवलंय पडद्यावर! दुसरं नूतनवर चित्रित ,मनमोहना बडे झूठे..." या गाण्या विषयी तर लतानेच प्रशंसा केलीय नूतनची !म्हणजे बघा....!खरंतर हरेक गाणं विशेषत्व घेऊनच येत असतं लताने गायलेलं!  त्या सगळ्याचा उल्लेख करणं म्हणजे संगीतमय महा कोषच तयार होईल!  पण केवळ वानगी दाखल सांगायचं तर गुलाम हैदर ,सज्जाद ,यांच्या संगीतातील अभिजातपणा लताच्या आवाजात सही सही अगदी ठळकपणे जाणवतो ! संगीतकार अनील विश्वास , एस डी , सी रामचंद्र ,नौशाद  रोशन यांच्या पठडीची मोहर लताने बेमालूम  उठवलीय गाण्यातून  .सलीलचौधरींच्या गाण्यातील खुमारी वाढलीच आहे लता च्या स्वरांनी! धीरगंभीर  हेमंत कुमार आणि वसंत देसाई ची कर्णमधुर  संगीतातला उठाव लताच्या सुरात रेंगाळत  राहतो. ही  गाणी  मनाचा गाभारा उजळवतात. तर रवी , चित्रगुप्त , एन दत्ता याची गोड गाणी लताची माधुरी जाणवून देतात.तर पुढे शंकर जयकिसन च्या संगीतात  तर  लता चे स्वर जणू झूम उठलेत!! 

खरं म्हणजे हे बारकावे सांगण्यापेक्षा ऐकणं च स्वर्गसुख आहे !कारण लताच गाणं च  शब्दातीत आहे! "ले गये वो साथ अपने ,साज भी ..."यातील काळजाचा पीळ केवळ स्वरातून प्रतीत करणं, केवळ  अद्भुतच आहे!

त्यामुळेच  बडे गुलाम अली , कुमार गंधर्व  सारख्या दिग्गजांनी म्हटलंय की ;'तासभर राग  आळवून परिणाम साधतो तो केवळ तीन मिनीटात लता करून दाखवते ' ! किती सार्थ उद्गार !किनई? 

कट्टर ओ पी नैय्यरने ही लताबद्दल गौरवोद्गार  काढलेत !महाराजा! जरी त्यांचं एकही गाणं लताने गायलेलं नाही तरी! 

आचार्य अत्रे ; पु ल. देशपांडे सारख्या महान व्यक्तींनी लताच गुणगान केलंय!

नुस्तं गाण्याचं नाही  ,तर समज ,ज्ञान ,सचोटी ,परिश्रम ...सारंच वाखाणण्याजोगं! 

अशी अलौकिक  सुंदर  मधुर कंठी  लता कुठं गेलीय? 

ती आहेच ;रसिकांच्या मनात !आणि कायम राहणारच आहे !

काळावर लताने आपल्या अमृत  स्वराने अलौकिक  इतिहास रचलाय!तो कुणीच मिटवू शकणार नाही ! 

माझ्या बाबतीत म्हणायचं तर म्हणेन ;तूsने हाsए रे जख्म ए जिगर को छू लिया....(नगीना)

यातल्या "हाsए" ने तर कबका मार डाला...  🎼🙏🌟✨

   

               लतारविंद!

No comments:

Post a Comment