Wednesday, October 11, 2023

नवरात्रोत्सव

भाद्रपदामध्ये गणपती बाप्पाचे आगमन झाल्यानंतर वेध लागतात ते म्हणजे शारदीय नवरात्रीचे. शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवीशी संबंधित व्रत आहे. नवरात्री हा हिंदू देवता दुर्गेच्या उपासनेला समर्पित सण आहे. नवरात्री म्हणजे 'नऊ रात्री', हा भारतातील अनेक भागांमध्ये सर्वात लोकप्रिय आणि मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणारा हिंदू सण आहे. 



आश्विन महिन्यात देवीची स्थापना (घटस्थापना) करून , नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजा करणे, म्हणजेच नवरात्रोत्सव.  नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा करण्यात येते. १. शैलपुत्री, २. ब्रह्मचारिणी ३. चन्द्रघंटा ४. कूष्मांडी  ५. स्कंदमाता ६. कात्यायनी ७. कालरात्री ८. महागौरी ९. सिद्धिदात्री अशी ही देवीची नऊ रूपे आहेत.  कोल्हापुर, तुळजापुर, माहुर आणि सप्तश्रृंगी या महाराष्ट्रातील साडेतिन शक्तीपिठांवर या दहा दिवसांमधे भाविकांची प्रचंड प्रमाणात गर्दी असते. 

पहिल्याच दिवशी एका टोपलीत माती घेऊन त्यात नऊ प्रकारचे धान्य पुरण्यात येते. टोपलीच्या मधोमध मातीचा घट ठेवण्यात येतो आणि त्याचीही पूजा करण्यात येते. प्रत्येक दिवशी या घटावर एक माळ चढविण्यात येते. तर सकाळी-संध्याकाळी धूप – दीप – आरती आणि देवीला नेवैद्य दाखवून देवीची पूजा करण्यात येते. शारदीय नवरात्र काळात काही जणांकडे नऊ दिवस देवीचा गोंधळ घालण्याची पद्धत आहे, जोगवा मागण्याची पण पद्धत आहे. नवरात्र मध्ये भजन, कीर्तन, माता की चौकी, जागरण,  देवीचा जागर तसेच विविध कार्यक्रम आयोजित करतात.

सार्वजनिक मंडळांमधे मोठया मोठया मुर्तींची स्थापना करण्यात येते. सुरेख असे देखावे तयार करण्यात येतात. पारंपारीक आणि पुराणकाळातील देखावे आकर्षक असतात आणि भाविकांचे लक्ष वेधणारे देखील असतात.

गुजरातचे लोक माँ दुर्गाच्या पंडाल सजवतात आणि त्यात माँ दुर्गाची मूर्ती बसवतात आणि संपूर्ण नऊ दिवस भजन, कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करतात. यासह, ते रास, गरबा नृत्य आणि दांडिया आयोजित करून संपूर्ण नवरात्रोत्सव साजरा करतात. रास किंवा दांडिया रास ( टिपरी नाच) हा गुजरात, भारताचा पारंपारिक लोकनृत्य प्रकार आहे. नवरात्रोत्सवादरम्यान, गुजरातमधील बहुतेक शहरांमध्ये लोक जमतात आणि गरबा नृत्य सादर करतात - हा कार्यक्रम भारतात आणि परदेशात जसे की मुंबई, पुणे, कॅनडा, युनायटेड स्टेट्स आणि परदेशातील मोठ्या गुजराती भाषिक समुदाय असलेल्या देशांमध्ये अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. महिला आणि पुरूष दोघेही सोबत नृत्य करू शकतात. बरेचजणं पारंपारीक गुजराती पोषाख घालुन गरबानृत्य करतात. नृत्याची सुरूवात मंद संगीताने केली जाते, जसजसे नृत्य पुढे जाते तसतसे नृत्य करणार्‍यांचा उत्साह वाढत जातो. संगीताला देखील मधे मधे बदलण्यात येतं आणि गरबागीतं वाजवले जातात. सौराष्ट्रात हे नृत्य करतांना घाघरा, चोली आणि ओढणी हा पेहराव असतो. या सोबतच सुरेख आणि आकर्षक आभुषण देखील घालतात.


नवरात्रीच्या काळात महाराष्ट्रात मुली संध्याकाळी भोंडला खेळतात.  भोंडला हा पश्चिम महाराष्ट्रात व कोकणात प्रचलित असलेला स्त्रियांच्या सामुदायिक खेळाचा प्रकार आहे. नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱ्याच्या दिवशी भोंडला खेळतात. नवरात्रीच्या नऊ दिवसात हस्त नक्षत्राचे प्रतीक असलेल्या हत्तीची प्रतिमा काढून मधोमध ठेवली जाते आणि तिच्याभोवती मुली फेर धरतात. पृथ्वीच्या सुफलीकरणाचा हा उत्सव मानला जातो. 

विविध शहरे आणि उपनगरांमध्ये गृहनिर्माण संस्था, कॉर्पोरेट कार्यालये, राजकीय पक्षांकडून नवरात्रोत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रात अनेक महिला दुर्गादेवीसमोर पारंपारिक 'मंगळागौरीचे खेळ' आयोजित करतात. अनेक ठिकाणी अष्टमीच्या दिवशी होमहवन करण्यात येते. काही ठिकाणी आरती झाल्यानंतर घागर फुंकणे हा विशेष कार्यक्रमही असतो.

नवरात्रातील नववा दिवस हा या उत्सवाचा शेवटचा दिवस असतो या दिवसाला महानवमी देखील म्हणतात. या दिवशी नऊ कुमारिकांना बोलावुन त्यांचे पुजन करण्याची प्रथा आहे. या नऊ कुमारिकांपैकी प्रत्येकीला देवी दुर्गेचे एक रूप मानले जाते. उत्तर भारतात नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी ९ मुलींना देवी म्हणून बोलावले जाते आणि त्यांना खायला घालतात आणि आशीर्वाद घेतात. 



नवरात्राचा दहावा दिवस दसरा म्हणुन साजरा करण्यात येतो. या दिवशी भाविक सरस्वतीची पुजा करतात आणि आई दुर्गेला मानसिक शांती आणि ज्ञानाचे मागणे मागतात. दसऱ्याला बऱ्याच मंडळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले जातात, तसेच सुगम संगीत आणि शास्त्रीय संगीताचे पण प्रोग्राम आयोजित केले जातात. 

for more details in English please click on link below 

https://meetkalakar.com/Artipedia/Entertainment-programs-for-Navratri-festival

You tube link -

https://www.youtube.com/watch?v=dn0THAfv0cw


No comments:

Post a Comment